खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुरवडी ते फलटण पायी प्रवास, वारकऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर : प्रतिनिधी
वारकरी संप्रदायात जात-पात, धर्म-पंथ नसतो. ‘सर्वघटी एकच परमात्मा भरलेला आहे’, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. त्याची प्रचिती वारीच्या वाटचालीत तरडगावच्या मुक्कामात आली.
प्रचंड पावसामुळे गावाच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. मंदिरे, सभागृह वारकऱ्यांनी तुडूंब भरली होती. तरीही बरेचसे वारकरी पावसात भिजत होते. रात्रीची वेळ होती.
चालून थकल्याने त्यांना घटकाभर आरामाची गरज होती. अशा वेळी त्यांच्यासाठी गावातील सर्वधर्मीय तरुणांनी पुढाकार घेत निवाऱ्याची सोय करून दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सुरवडी ते फलटण दरम्यान वारकऱ्यांसमवेत पायी वाटचाल केली. वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या योजनांबाबत चर्चा केली.
खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, बाळासाहेब काशिद, रमेश कोंडेही सहभागी होते. दरम्यान, डॉ. शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांची भेट झाली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. काही काळ दोघांनी एकत्र चालण्याचा आनंदही घेतला.