शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवण्याचा ठराव एकमताने मंजूर, काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

सोलापूर : प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसच्या कार्यालयात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जवळपास शहरातील शंभर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे, वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग प्रदेशाध्यक सुदीप चाकोते, माजी युवक अध्यक्ष बाबा करगुळे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, अरिफ शेख, देवा गायकवाड, शिवा बाटलीवाला, अशोक कलशेट्टी, केशव इंगळे, सुशील बंडपट्टे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मध्य मधून खासदार प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे शहर उत्तर पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावेत अशी प्रामुख्याने मागणी बाबा करगुळे, अशोक कलशेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ, युवा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मागील दोन टर्म पराभव होऊन डिपॉझिट जप्त झाले, शहर मध्य मतदारसंघ मध्ये खासदार प्रणिती शिंदे या सलग तीन टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघ मागील निवडणुकीत बाबा मिस्त्री यांचा थोडक्यात पराभव झाला. या सर्व कारणांमुळे शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात काँग्रेसची पूर्वीपासून ताकद आहे आता खासदार प्रणिती शिंदे निवडून आल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्साह वाढला आहे. या सर्व कारणांमुळे शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस निवडून येईल असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बैठकीत मांडला. तिन विधानसभा मतदारसंघ जर काँग्रेसने लढवले तर महाविकास आघाडीचे काय होणार.? असा प्रश्न मित्रपक्षास पडलाय. महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळून इतर पक्षातील भावी आमदार, इच्छुक आमदार यांची गोची झाली आहे.
काँग्रेसच्या बैठकीत शहर उत्तर, मध्य, दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी मागणी केली. ही सर्व मागणी माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांना सांगण्यात येईल. तिन्ही मतदारसंघ काँग्रेस लढेल आणि जिंकून येईल असा ठाम विश्वास काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केला.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या इच्छुक शहर उत्तर, मध्य, दक्षिण मधील भावी आमदार कोणती भूमिका घेणार.? काँग्रेस महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांना न्याय देणार का.? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात नक्कीच मिळतील.