IAS अधिकारी मनीषा आव्हाळे रमल्या भारुडात, पालकमंत्री जिल्हाधिकारी वारकऱ्यांच्या वेशात दर्शनाला

सोलापूर : प्रतिनिधी
आळंदीहून निघालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे वारकऱ्यांच्या वेशात आल्याने सर्वाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे हे देखील नऊवारी साडी घालून वारीमध्ये सहभागी झाले होते.
मानाच्या माऊलींच्या पालख्या पंढरीच्या दिशेने येत आहेत. गुरुवारी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. आषाढीवारीत अनेक भक्त मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. यात लहान थोर, आबाल वृद्ध पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊन जातात.
वारकरी हरिनामाच्या नामात तल्लीन होऊन नामस्मरण करत असतात परंतु एखादा आयएएस अधिकारी हा क्वचित वारकऱ्यांमध्ये रमल्याचं पहावयास मिळतो अशीच घटना यंदाच्या वारीत घडली. IAS अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या नऊवारी साडी, वारकरी फेटा बांधून गळ्यात टाळ घेऊन भारुडामध्ये रमल्याचं पहावयास मिळाल.
आयएएस अधिकाऱ्यांमध्ये देखील एक भक्त असतो हे या दृश्यातून सर्वाना दिसले. आयएएस अधिकारी मनीषा आवळे या भारुडात रमल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सर्वत्र वायरल होत आहे आणि सर्वत्र आव्हाळे यांचे कौतुक केले जात आहे.