अल्टीमेटम संपले.. जरांगेंच्या आजच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष, दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त, रॅलीवर चौकाचौकात करणार फुलांची उधळण

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 6 जुलैपासून मराठवाड्यात सुरु केलेल्या केलेल्या महासंवाद शांतता रॅलीचा समारोप शनिवारी (दि. 13) रोजी छत्रपती संभाजीनगरात होत आहे. आरक्षणाची मागणी घेऊन उठलेले मराठा समाजाचे हे भगवे वादळ शनिवारी सकाळी संभाजीनगरात धडकेल. या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.
या समारोप रॅलीत मनोज जरांगे नेमके काय बोलतात, आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. ही लाखोंच्या संख्येची रॅली शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सकल मराठा समाजासह प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
डेडलाइन संपली, जरांगेंची पुढील भूमिका काय?
सगेसोयरेचा अध्यादेश काढून सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 8 ते 13 जून दरम्यान अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केले होते. 13 जून रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि खा. संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सरकारला वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार 13 जुलैपर्यंतची वेळ दिली होती. दरम्यान, जरांगे यांनी हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना येथे महासंवाद रॅली काढली. या रॅलीचा समारोप 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून याच दिवशी सरकारला दिलेली डेडलाइनदेखील संपत आहे. त्यामुळे या रॅलीच्या समारोपाला जरांगे काय बोलणार?, त्यांची पुढील भूमिका काय असेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
मनोज जरांगे यांच्या महासंवाद रॅलीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. 3 उपायुक्त, 5 सहायक आयुक्त, 29 पोलिस निरीक्षक, 83 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 874 पुरुष अंमलदार, 132 महिला अंमलदार, 200 हून अधिक होमगार्ड यांचा फक्त आणि फक्त रॅलीला बंदोबस्त असणार आहे. सात सेक्टरमध्ये हा बंदोबस्त लावला असून पहिल्या 4 सेक्टरचे प्रमुख उपायुक्त नवनीत काँवत तर उर्वरित तीन सेक्टरचे प्रमुख उपायुक्त नितीन बगाटे हे असणार आहेत. त्यांना सहायक आयुक्त हे सहप्रभारी अधिकारी म्हणून नेमले आहेत. रॅलीच्या समोर एक सहायक आयुक्त, तीन निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि एक आरसीपी पथक राहिल. त्याच प्रमाणे रॅलीच्या मागील बाजुला चार अधिकारी आणि आरसीपी पथक तैनात असेल. यात रॅलीमध्ये दामिनी पथकही तैनात असेल. प्रत्येक उड्डाणपुलावरही बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील सर्व राजकीय पुढारी आणि वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानीदेखील पोलिस तैनात केले आहेत. सहा ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केली जाणार आहे.
चौकाचौकात फुलांची उधळण
मनोज जरांगे सिडको येथून निघाल्यानंतर प्रत्येक चौकात जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येणार आहे. दहा ते बारा जेसीबीच्या माध्यमातून शेकडो टन फुलांची उधळण केली जाणार आहे.
अशी निघेल रॅली?
सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे हे सिडको चौकात येतील.
खुलताबाद तालुक्यातून आणलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा 12 फुटी पुतळा सोबत असेल. हाच पुतळा मुंबईला गेलेल्या रॅलीतही होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होईल.
त्यानंतर ही रॅली जालना रोडने सेव्हनहिल उड्डाणपूल- आकाशवाणी, मोंढा नाका, दूध डेअरी चौक मार्गे क्रांती चौकात जाईल.
तेथे मनोज जरांगे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतील. या आंदोलनाची पुढील दिशा तेथेच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.