राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची तत्परता, तिघांना मिळाले जीवदान, रुग्णवाहिका न आल्याने NHAI वर केली नाराजी व्यक्त

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर पुणे बायपास रोडवर संध्याकाळी ८:३० च्या सुमारास एका थांबलेल्या मालवाहतूक वाहनाला रिक्षा चालकाने पाठीमागून धडक दिली. घटना स्थळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे हे त्यांच्या कार्यकर्त्यासह बारामतीहून सोलापूर कडे येताना हा प्रकार पाहिला. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून रिक्षाचालक व रिक्षातील इतर दोघांना रिक्षातून बाहेर काढून जीव वाचवला त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
रिक्षा मधील तिघांनाही सुजित अवघडे व वैभव गंगणे व त्यांच्या समर्थकांनी बाजूला नेले. या घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती तात्काळ सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस दिलीप शिंदे यांना कळवली तात्काळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी NHAI विभागाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता रुग्णवाहिका नसल्याचे NHAI विभागाने फोन वरून वैभव गंगणे यांना कळवले. याबाबत वैभव गंगणे व सुजित अवघडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नशीब बलवत्तर म्हणून त्या तिघांचा जीव वाचला मात्र एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने NHAI विभागाच्या निष्काळजी, गलथान कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय. निष्काळजीपणा करणाऱ्या NHAI विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणयाची मागणी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी दिली.
दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी वैभव गंगणे, सुजित अवघडे, त्यांचे कार्यकर्ते तसेच फौजदार चावडी पोलिसांनी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. घटनेनंतर मालवाहतूक वाहन घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले.