मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न, विजय पोखरकर यांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा वाचला जीव

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेहमी गजबजलेला परिसर म्हणून सर्वांना परिचित आहे. परंतु एखादी घटना घडली तर तेथे बघायची लगेच मोठी गर्दी होते असाच एक प्रकार आज पहावयास मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली एक तरुण धारदार चाकूने हातावर सपासप वार करत होता. मात्र त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातातील चाकू काढून घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हते.
तेवढ्यात सकल मराठा समाजाचे समन्वयक विजय पोखरकर हे तेथून जात होते त्यांनी गर्दी पाहून आत मध्ये प्रवेश केला आणि लागलीच त्या युवकाच्या हातातील चाकू घेत बाजूला टाकून त्याला जीव देण्यापासून वाचवले.
ऋषिकेश शहाजी भोसले राहणार पुळूज तालुका पंढरपूर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. आई वडील नाहीत, लहान भाऊ आहे. सध्या बारावी मध्ये शिकत आहे. पुळूज येथुन चालत सोलापूरच्या दिशेने आला दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून एक धारदार शस्त्राने हातावर वार करत होता. ही घटना अनेक जण पाहत होते. मात्र त्याच्यासमोर जाऊन त्याला परावृत्त करण्याचे धाडस कोणी करत नव्हते. सकल मराठा समाजाचे समन्वयक विजय पोखरकर हे तिथून जात असताना त्यांच्या निदर्शनास घटना आली.
ऋषिकेश भोसले याच्याकडे चौकशी केली असता त्याने अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आरक्षणामुळे मराठा समाजाची वाहतात होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आरक्षणासाठी आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही घटना सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ समन्वयक राजन जाधव यांना समजली त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. राजन जाधव यांनी ऋषिकेशला रस्त्याच्या कडेला घेऊन त्याची समजूत काढली. या घटनेसाठी माहिती कळताच घटनास्थळी पोलिस आले. ऋषिकेश शहाजी भोसले यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.