खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत माने यांचा केला सत्कार, दै.’तरुण भारत’च्या मुख्य संपादक पदी पदोन्नती

सोलापूर : प्रतिनिधी
दैनिक ‘तरुण भारत’चे निवासी संपादक प्रशांत माने यांना मुख्य संपादकपदी पदोन्नती देण्याची घोषणा तरुण भारत मिडिया लि.चे चेअरमन तथा प्रबंध संपादक विवेक घळसासी आणि कार्यकारी संचालक तथा मुख्य समूह संपादक दिलीप पेठे यांनी केली. कार्यकारी संपादक, निवासी संपादक या पदावर यशस्वी कार्य करणारे प्रशांत माने यांच्यावर आता मुख्य संपादकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडी निमित्त विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठान, यांच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिव सन्मान यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जात आहे. यानिमित्त सोलापुरात देखील खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आला. यानिमित्त संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या सोलापूर दौऱ्यावर होत्या त्यांनी दैनिक तरुण भारत च्या मुख्य संपादक पदी प्रशांत माने यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक सकाळचे संपादक अभय दिवाणजी, उपसंपादक मनोज व्हटकर, शंकर जाधव, दशरथ वडतीले, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांची उपस्थिती होती.
सन १९९४ साली दैनिक तरुण भारतमधून वार्ताहारपदावर कामाने सुरुवात केलेले प्रशांत माने यांनी आजपर्यंत दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी आदी विविध दैनिकांतून पत्रकारिता केली आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशांत माने यांच्यावर कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी होती. जानेवारी २०२४ मध्ये निवासी संपादकपदी पदोन्नती देण्यात आली होती. ९ ऑगस्ट २०२४ पासून प्रशांत माने यांच्यावर तरुण भारतच्या मुख्य संपादकपदाच्या जबाबदारीची घोषणा केली. विशेष म्हणजे शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी तरुण भारतच्या सर्व माजी संपादकांचा सन्मान आणि आजी-माजी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्यात श्री. घळसासी यांनी प्रशांत माने आजपासून मुख्य संपादक असतील अशी घोषणा केली. श्री. घळसासी आणि श्री. पेठे यांच्या हस्ते प्रशांत माने यांचा शाल, पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. यावेळी सर्व माजी संपादक आणि आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.