सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

अघोरी नृत्य अन् ‘गारुडी गोंबे’ ने आणली रंगत

अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात : हजारो भाविकांचा सहभाग

सोलापूर : प्रतिनिधी

हलगीच्या तालावर नाचणारे घोडे, दिल्लीहून आलेल्या अघोरी नृत्य पथकाचे सादरीकरण अन् विजयपूर येथील कर्नाटकी ‘गारुडी गोंबे’ ने रंगत आणली. निमित्त होते श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट आयोजित अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे.

श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजींच्या समाधी सुवर्ण महोत्सवानिमित्त विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवार २६ ऑगस्ट टे रविवार १ सप्टेंबर दरम्यान अतिरूद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली.

बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मठाचे संस्थापक प. पू. सद्गुरु श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी शोभायात्रेत ठेवण्यात आलेल्या भगवान श्री शंकरांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शोभायात्रेच्या अग्रभागी दिल्ली येथून आलेले महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण पथक होते. भगवान महादेवांच्या विविध गीतांवर या पथकाने अघोरी नृत्य सादर करून भाविकांची मने जिंकली. यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.

फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्री सिद्धारूढ महास्वामीजी आणि श्री बसवारूढ महास्वामीजी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. तर सजवलेल्या बग्गीत मठाचे संस्थापक प. पू. सद्गुरु श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी आणि प. पू. श्रो. ब्र. श्री जडेसिध्देश्वर महास्वामीजी बसले होते. तर दुसऱ्या बग्गीत सिद्धरूढ मठाच्या प. पू. श्रो. ब्र. श्री. सुशांता देवी होत्या.

शोभायात्रेत ठेवण्यात आलेली भगवान शंकरांची सहा फुटी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. विजयपूर येथील कर्नाटकी ‘गारुडी गोंबे’ चे सादरीकरण शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. ‘गारुडी गोंबे’ चे नृत्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी सोलापूरकरांनी या नृत्याची छबी आपल्या भ्रमणध्वनीमध्ये कैद केली. तसेच अनेक जणांनी या बाहुल्यांसोबत सेल्फी घेतली. होटगी येथील ११ हलगी अन् तुतारीच्या पथकाने वातावरणात जोश भरला. मिरवणूक मार्गावर भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन शोभायात्रेचे स्वागत केले.

श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरुवात झालेली शोभायात्रा श्री कसबा गणपती, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौकमार्गे श्री आजोबा गणपती मंदिराजवळ आली. येथे पूजन करुन मिरवणूक श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाकडे मार्गस्थ झाली.

या शोभायात्रेत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, माजी महापौर शोभा बनशेट्टी, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते, ट्रस्टचे विश्वस्त सतीश कुलकर्णी, लिंगायत असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. संतोष होसमनी आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!