आरोग्यमंत्री तानाजी सावंत असे वक्तव्य करत असतील तर अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे : उमेश पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात भाषणादरम्यान बोलताना केलेल्या विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्या विधानाचे पडसाद उमटत असून राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तानाजी सावंत असे वक्तव्य करत असतील तर अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला उमेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानाला प्रतिउत्तर दिले आहे. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. तुमचा आम्ही आदर करतो, पण अजित दादांना सत्तेत तुम्ही घेतला नाही, याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्र्यानी असे विधान करू नये. आरोग्य मंत्र्याचे असे विधान ऐकण्याऐवजी अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला उमेश पाटील यांनी अजित दादांना दिला आहे.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमावेळी खळबळजनक दावा केला आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यात कधीच पटले नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासोबत कधीच पटले नाही. आम्ही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असे विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसवर सावंत यांनी टीका केली होती.