अभाविपच्या शोभायात्रेतून घडले महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन, भगवे फेटे अन पारंपारिक वेशभूषेने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
भगवे फेटे बांधलेले, पांढरी वारकरी टोपी परिधान केलेले तरुण विद्यार्थी कार्यकर्ते, नऊवारी साडीसह विविध पारंपारिक पोशाखांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी कार्यकर्त्या, भारतमाता आणि श्री शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अन् ढोल ताशांचा कडकडाट अशा अत्यंत उत्साहाने भारलेल्या वातावरणात शोभायात्रा निघाली.
निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाचे. या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन सोलापूरकरांना घडले.
प्रदेश अधिवेशन सुरू असलेल्या हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून मंगळवारी दुपारी शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभा यात्रेच्या अग्रभागी सजविलेल्या चार चाकी गाडीत विद्येची देवता सरस्वती आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ध्वज घेतलेल्या कार्यकर्त्यांचे ध्वज पथक होते.
ढोल ताशे आणि हलग्याच्या कडकडाटात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ठेका धरला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय, वंदे मातरम्, जिंदाबाद बोलो जिंदाबाद विद्यार्थी परिषद जिंदाबाद आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणांपैकी काही तरुणांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची तर काही तरुणांनी वारकऱ्यांची वेषभूषा केली होती. या शोभायात्रेत अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी, स्वागत समिती सचिव सुहास जोशी, प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी,
प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा, पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य प्रा. प्रशांत साठे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब घावटे, सांगली विभाग प्रमुख प्रा. निर्भयकुमार विसपुते, अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत चाबुकस्वार, महानगरमंत्री यश उडाणशिव आदी सहभागी झाले उपस्थित होते.
ह.दे.प्रशाला येथून सुरू झालेली शोभायात्रा जिल्हाधिकारी निवास, पूनम गेट जिल्हा परिषद, पंच कट्टा, विजयपूर वेस, माणिक चौक, कसबा पोलीस चौकी, दत्त चौक, सावरकर मैदान, सुभाष चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली. या ठिकाणी शोभायात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले. याप्रसंगी राष्ट्रीय मंत्री कु. शालिनी वर्मा, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, ओम इंगळे, राधेय बाहेगव्हाणकर, आनंद गांधी, मेघा शिरगावे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रदेश अधिवेशनाचा आज समारोप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा आज (बुधवारी) समारोप होणार आहे. बुधवारी अधिवेशनात जिल्हाश: बैठका, भाषण सत्र, प्रस्ताव सत्र, आगामी दिशा, प्रदेश कार्यकारणी बैठक आणि समारोपाचा कार्यक्रम होणार आहे, असे अभाविपचे महानगरमंत्री यश उडाणशिव यांनी सांगितले.