सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सोलापूरच्या विमानसेवेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जनआक्रोश, सोलापूर विकास मंचचे तीव्र उपोषणाची हाक

सोलापूर : प्रतिनिधी

होटगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्त्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले आहे. सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमानसेवेची प्रतीक्षा करत आहेत. ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. मात्र, नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, पर्यटन, तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे.

सोलापूर विकास मंच आणि संपूर्ण सोलापूरकरांनी या प्रकल्पासाठी अपार मेहनत घेतली आहे. विमानतळाच्या सिव्हिल कामांपासून सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप नागरी सेवा सुरू न होणे हे सोलापूरकरांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला धक्का आहे.

या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

“सोलापूरचा विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरोधात एकजुट दाखवण्याची ही वेळ आहे,” असे या आंदोलनाचे आयोजनकर्ते म्हणाले. नागरी विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, गणेश शिलेदार, गौरी आमडेकर, आरती अरगडे, श्रीकांत बनसोडे, प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!