शहर मध्य ‘माकप’ला न सोडण्याची मागणी, सोलापूर लोकसभेतील सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत ‘शहर मध्य’च्या आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर उत्तर, शहर मध्य, पंढरपूर- मंगळवेढा हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवावेत, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केली आहे. तर पक्षाचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माढा मतदारसंघाची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी प्रदेश प्रभारी रमेश चैन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली. त्यावेळी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेण्यात आला. विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अर्ज केलेल्यांची माहिती यावेळी जाणून घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, विनोद भोसले, सुशील बंदपट्टे, मनोज यलगुलवार, अंबादास करगुळे, रियाज हुंडेकरी, कोमारू सय्यद, नंदकुमार पवार, प्रकाश पाटील हे उपस्थित होते.
शहर मध्य’ मतदारसंघाचा पेच कायम
लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडी म्हणून ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली. आता आडम मास्तर विधानसभा निवडणुकीसाठी शहर मध्य या मतदारसंघातून इच्छुक आहेत. परंतु, शहर मध्य काँग्रेसचा बालेकिल्ला असून, तो आपल्याकडेच ठेवावा. त्याठिकाणी आडम मास्तरांना उमेदवारी देऊ नये, असा सूर देखील पुण्यातील बैठकीत ऐकायला मिळाला. त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाष्य टाळल्याने या मतदारसंघाबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.