7 ऑक्टोंबर रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचार विरोधात अर्धनग्न आंदोलन : बालाजी चराटे
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन व कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन सोलापूरसह संपुर्ण महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि आर्थिक सक्षम बनविण्यासाठी सन 2010-11 पासून विविध योजना जाहिर केले. त्यामध्ये सुरक्षा पेटी, मध्यान भोजन, कन्या विवाह अनुदान, शैक्षणिक अनुदान, गृह बांधणी अनुदान, गृह उपयोगी वस्तु संच (भांडी) व इतर असे 28 योजनांचा लाभ मिळतो. या संपुर्ण योजनांचा कामकाज प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या देखरेखेखाली चालतो.
बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी लागते. या नोंदणी साठी बांधकाम ठेकेदाराचा प्रमाणपत्र आवश्य आहे. त्यानंतर संबंधीत कामगारांना शासकीय ओळखपत्र दिला जातो. असे ओळखपत्र असलेल्या बांधकाम कामगारांना वरील योजनेचा लाभ मिळतो. परंतु यामध्ये योजनेचा लाभ मिळविण्याकरिता खाजगी दलाल, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी हे गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे घेतात. या मोबदल्यात इतर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवितात. आणि प्रत्येक लाभाला रक्कम वेग वेगळी ठरलेली आहे. ते घेतल्याशिवाय योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना देतच नाहीत.
बांधकाम कामगारांना वरील अनेक योजनांपैकी नुकतेच सुरू करण्यात आलेले गृह उपयोगी वस्तु संच (भांडी) देण्याचे सुरू झाले. त्यावेळे पासुन बांधकाम कामगारांची नोंदणी इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की, सोलापूर जिल्ह्यात आज तारखे पर्यंत अंदाजे 2 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 लाख बांधकाम कामगार आहेत का ? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजेच बोगस कामगारांची नोंदणी सुरू आहे. यात शंका नाही. त्याच बरोबर गृह उपयोगी वस्तु संच (भांडी) वाटप हे सहाय्यक कामगार यांच्या मार्फत न होता ठेकेदारा कडून वाटप होते. त्यामुळे ठेकेदार मनमानी प्रमाणे प्रत्येक कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये रोखीने घेऊन भांडीचे कुपन देतात. यामध्ये सत्ताधारी राजकीय पक्षांचा देखील सहभाग आहे. अलीकडेच शिवसेना शिंदे गट, भा.ज.पा. पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, इतर राजकीय पक्ष व स्वयंघोषित कामगार संघटना हे स्वतः शिबीरे घेऊन आपल्याच कार्यकर्ताची नोंदणी करून भांडी वाटप करून योजनेचा लाभ देतात. खरे पाहता नियमानुसार बांधकाम कामगार जिथे काम करतात तिथे शिबीरे घेऊन सुरक्षा पेटी, गृह उपयोगी वस्तु संच (भांडी) वाटप करणे आवश्यक आहे. तसे न करता सहाय्यक कामगार आयुक्तांच्या संगनमताने ठेकेदार, दलाल, राजकीय पक्ष व स्वयंघोषित कामगार संघटना आणि इतर असे सर्व मिळून या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व फसवणुक करीत आहेत. हे रोखण्यासाठी सोलापूरातील प्रमुख मान्यता प्राप्त कामगार संघटना एकत्रित आले.
1. महाराष्ट्र कामगार सेना, 2. सह्याद्री कामगार संघटना, 3. बहुजन पॅत्थर सेना, 4. संघर्ष कामगार संघटना, 5. भ्रष्टाचारी विरोधी संघटना या पाचही संघटना एकत्रित येऊन 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सोलापूर यांना निवेदन देऊन बांधकाम कामगारांच्या योजनेत चाललेल्या भ्रष्टाचार व अनागोंधा कारभार थांबविण्यासाठी गृह वस्तु संच (भांडी) टोकण पध्दत बंद करून आपल्या देखरेखेखाली मोफत वाटप करावी अशी मागणी केली. तेव्हा कामगार आयुक्त यांनी टोकण पध्दत बंद करण्याचे आश्वासन दिले. परंतु टोकण पध्दत बंद झालेली नाही. व राजकीय पक्ष शिबीरे घेऊन भांडी वाटप करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर 3 ऑक्टोंबर 2024 रोजी वरील पाच संघटनांनी मिळून सहाय्यक कामगार आयुक्तांना परत निवेदन देण्यात आले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी यांना निवेदन दिले. सदर निवेदनात 1 ते 3 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ठेकेदारामार्फत भांडी संच टोकण वाटप चालूच आहे.
त्याचबरोबर ठिकठिकाणी कीट वाटपाचे शिबीरे सुरुच आहेत. म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त, कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय दमाणी नगर, सोलापूर येथे 7 ऑक्टोंबर 2024 रोजी सोमवार सकाळी 11 वाजता शेकडो बांधकाम कामगारांसह अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत.
या पत्रकार परिषदेस विष्णू कारमपुरी, बालाजी चराटे, गणेश गुड्डू, अंगत जाधव, सुहेल शेख, आदी उपस्थित होते.