बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वाचले युवकाचे प्राण

सोलापूर : प्रतिनिधी
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे रात्री गस्त घालत असताना, रात्री एक वाजल्याच्या सुमारास बार्शी – लातूर रोडवर, पांगरी जवळ, एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याचे दिसून आले. अपघात एवढा गंभीर होता की अक्षरशः चारचाकी गाडीच्या पलट्या झाल्या होत्या.
या अपघातामध्ये चारचाकी मधील एक युवक जखमी अवस्थेमध्ये गाडीमध्येच अडकलेला होता. एवढ्यात गस्तीसाठी निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तात्काळ गाडी थांबवून, सदरील अपघातग्रस्त चारचाकी मधील युवकाला स्वतः बाहेर काढून सहकाऱ्यांच्या मदतीने पांगरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले.
सदरील जखमी युवकाचे नाव अजय पांचाळ असून, तो धाराशिव जिल्ह्यातील सांजा येथील रहिवाशी असल्याचे समजले. याप्रसंगी दिलीप ढेरे यांनी जखमीचा मोबाईल घेऊन घडलेला प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. दिलीप ढेरे हे आपल्या साहसी व धाडसी कार्यामुळे नेहमीच एक कार्यक्षम व दबंग पोलीस अधिकारी म्हणून चर्चेत असतात.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये अतिशय चोखपणे बंदोबस्त राबविल्याबद्दल, त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या कार्य तत्परतेमुळे एका युवकाचे प्राण वाचले असून, यामुळे बार्शी तालुक्यातून दिलीप ढेरे यांचे कौतुक केले जात आहे.