हरवलेल्या तीन वर्षाच्या मुलाला फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या चार तासात केले आईच्या स्वाधीन

सोलापूर : प्रतिनिधी
फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत ॲम्बेसिडर हॉटेलच्यासमोर 03 वर्षाचा मुलगा बेवारस स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई वामने (बीट मार्शल) यांना मिळून आला. त्यांनी सदर बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्याने सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले.
नातेवाईकाच्या अंत्यविधीकरिता गवळी कुटुंबातील सदस्य जुना पुना नाका परिसरात आले होते. या मयतीमध्ये तीन वर्षाचा स्वराज सुद्धा आला होता. गर्दीमध्ये तो हरवून गेला. मुलगा हरवल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली होती.
ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित केला. त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाणेस बोलावून घेतले. सदर पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून सदर बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले.
त्या बालकाला ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या 04 तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे-पाटील, पो. शि. पाटील व वामने यांनी केली आहे.