शरदनिष्ठ राहिल्यानेच आपल्यावर अजितदादां कडून वारंवार अन्याय, सपाटे यांनी मांडली पक्षापुढे व्यथा, शहर उत्तरची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्यावर अजितदादां कडून वारंवार अन्याय करण्यात आल्याची खंत व्यक्त करून माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे मागणी केली आहे.
नुकतेच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी देखील मुलाखत देऊन आपण शहर उत्तर साठी इच्छुक असल्याचे सांगितले.
गेल्या 45 वर्षांपासून आपण महापालिका व पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे. या पूर्वी आपण या मतदारसंघातून दोनदा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. मात्र, पक्षाने आपल्याला ए बी फॉर्म न दिल्याने त्यावेळी आपल्याला अपक्ष म्हणून लढावे लागले. काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आपल्याला त्यावेळी बळ देण्यात आले.
मोहिते-पाटील घराण्याचासुद्धा यासाठी आपल्याला पाठिंबा होता असे सपाटे यांनी पक्षाकडे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामुळे आपल्यावर अनेकदा अन्याय झाला. आपण शरदनिष्ठ असल्यानेच त्यांच्याकडून हा अन्याय केला गेला. त्यामुळेच आपल्याला त्यावेळी मिळालेला एबी फॉर्म काढून ऐनवेळी महेश गादेकर यांना देण्यात आला, असा गौप्यस्फोटही सपाटे यांनी आपल्या या मुलाखतीत केला आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन मोठ्या पवारांकडून सपाटे यांच्यावरील हा अन्याय दूर करण्यात येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.