दक्षिणमधून युवराज राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भरला उमेदवारी अर्ज, यंदा परिवर्तन घडवणार : युवराज राठोड

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्या या आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून एक प्रकारे विरोधातील उमेदवारांना टेन्शन देत आव्हान दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मातब्बरांना एकत्र करून युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. यापूर्वी 2019 ची विधानसभा निवडणूक राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवली होती.
त्यामुळे युवराज राठोड यांना दक्षिण मतदार संघाचा अनुभव आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची सुमारे 40 ते 50 हजार मतदान आहे तसेच युवराज राठोड हे सर्व समाजात परिचित आहेत. त्यांना नक्कीच याचा फायदा होईल असे बोलले जाते.
हा उमेदवारी अर्ज दाखल करताना दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीतील श्रीशैल हत्तुरे, सतुबर सर, मोतीराम चव्हाण, फुलसंग चव्हाण, अकबर शेख, अमोल दळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.