माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी, ड्रोन कॅमेरा द्वारे पालखी सोहळ्यावर पोलीसांची करडी नजर

सोलापूर : प्रतिनिधी (सातारा)
तब्बल अडीच दिवसांचा सर्वात मोठा मुक्काम आटोपून आज दुपारी ज्ञानेश्वर माऊलींचा पायी वारी पालखी सोहळा दुपारी महानैवेद्य आरती झाल्यावर तरडगाव कडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा दुपारी चार वाजता सोमवारी चांदोबाचा लिंब येथे पारंपारिक पद्धतीने संपन्न होणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामासाठी तरडगाव कडे निघणार आहे.
दरम्यान लोणंद येथे शनिवारी सायंकाळी विसावलेला पालखी सोहळा तब्बल अडीच दिवस मुक्कामासाठी होता. अडीच दिवसाचा या वारी सोहळ्यातील सर्वात मोठा मुक्काम असल्यामुळे वारकरी खऱ्या अर्थाने इथे निवांत होते अनेकांनी कपडे धुणे, दाढी, कटिंग यासारखी कामे उरकली तसेच दुपारी तंबूच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये भारुड, कीर्तन, भजन तसेच पारंपारिक पोवाडेही रंगल्याचे पाहायला मिळाले. तीन ड्रोन कॅमेऱ्यांच्या द्वारे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे या सर्व पालखी सोहळ्यावर विशेष नजर ठेवण्यात आली होती.
ज्ञानेश्वर महाराजांच्या चांदीच्या पादुका असलेला पालखीचा तंबू विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता तसेच या परिसरामध्ये दर्शनाच्या विशेष रांगा लावण्यात आल्या होत्या लोणंदचा हा टप्पा मध्यवर्ती पडत असल्यामुळे सातारा,सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातूनही दर्शनासाठी भाविकांनी अडीच दिवस प्रचंड गर्दी केली होती. त्याचा ताण पोलीस दलावर पडल्याचे दिसून येत होते दुपारनंतर दर्शनासाठी सर्व रस्ते एक मार्गी रांगा लावून चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले होते पोलीस कर्मचारी यासाठी विशेष परिश्रम घेताना दिसत होते.
पालखी तळ परिसरात उभारलेली खाद्यपदार्थ लहान मुलांची खेळणी बुक्का, बेलफुल आदींची स्टॉलही लक्ष वेधून घेत होते कपाळावर गंध व बुक्क्याचा टिळा लावून भाविक दर्शनासाठी रांगा लावून उभे होते सातारा कडून येणाऱ्या तसेच शिरवळ, फलटण आणि पुण्याकडून येणाऱ्या सर्व मार्गांवर चार चाकी वाहनांना विशेष पार्किंग तळ उभारून तेथेच वाहनांचा पार्किंगचा बंदोबस्त करण्यात आला होता. लोणंद तसेच परिसरातील गावातील अनेक ग्रामस्थांनी आज माऊलींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घरोघरी सण साजरा केला तसेच अनेक वारकऱ्यांना जेऊ घालण्यात आले.