शहरातील तीनही मतदारसंघात राजस्थानी अन् मारवाडी समाज भाजपा महायुतीच्या पाठीशी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा विश्वास

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रनिर्माणात राजस्थानी आणि मारवाडी समाजाचा वाटा मोठा आहे. विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तीनही मतदारसंघात राजस्थानी, मारवाडी समाज भाजपा आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला.
राजस्थानी आणि मारवाडी समाज संस्थांतर्फे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी गुजराती मित्र मंडळ सभागृहात मारवाडी समाज संमेलन उत्साहात झाले. या संमेलनात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर किशोर देशपांडे, रामवल्लभ जाजू, पापाशेठ दायमा, माजी नगरसेवक बाबुभाई मेहता, भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, भाजपचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, शिवसेनेचे आरोग्य विभाग प्रमुख जवाहर जाजू, भाजपा व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष अनुपम खंडेलवाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, राजस्थानी मारवाडी समाज कष्टाळू आहे महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात मेहनतीने या समाजाने आपले स्थान निर्माण केले आहे. हा समाज देश निर्माणाच्या भावनेशी जोडला आहे. त्यामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार यांनी केलेल्या विकासकामांच्या पाठीशी राजस्थानी आणि मारवाडी समाज उभा आहे. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिन सरकार येण्यासाठी, महाराष्ट्राच्या दुप्पट प्रगतीसाठी सोलापूरकरांनी भाजपा आणि महायुतीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले, सोलापूर शहरात गेल्या अनेक पिढ्यांपासून राजस्थानी मारवाडी समाज राहतो. शहराच्या विकासात या समाजाचे योगदान मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सोलापूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहनही विजयकुमार देशमुख यांनी याप्रसंगी केले.
भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी प्रास्ताविक केले. चेतन शर्मा आणि श्रीनिवास दायमा यांनी सूत्रसंचालन तर शहर भाजपाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी इंदरमल जैन, गौतम संचेती, संतोष बंब, विजय जाजू, अशोक संकलेचा, बनवारीलाल उपाध्याय, लोकेश उपाध्ये, रजनी शर्मा, सविता जोशी, संगीता दायमा, मंगल दायमा आदी उपस्थित होते.
राजस्थानी पगडी अन् श्री शिवचरित्र
सोलापुरातील राजस्थानी आणि मारवाडी समाजाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सत्कार यावेळी राजस्थान पगडी, श्री शिवचरित्र, चंदन हार आणि सोलापुरी टॉवेल देऊन करण्यात आला.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका भाजपात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका उषा हब्बू आणि त्यांचे पती, चर्मकार समाजाचे अध्यक्ष मलिक हब्बू यांनी या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.