सुनेचा विनयभंग केल्या प्रकरणी सासऱ्यासह इतर ७ जणांची निर्दोष मुक्तता

सोलापूर : प्रतिनिधी
यात आरोपी नामे जगन्नाथ माने, नागप्पा बनसोडे, अनिता माने, तिपव्वा बनसोडे, कस्तूरा गाडेकर, महानंदा चौन्गल, गजेंद्र बनसोडे, नागप्पा चौन्दल सर्व रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर यांची सुनेचा विनयभंग करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी सोलापुर येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. पी. पाटील साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी की, फिर्यादीचे लग्न दि. ०२/०६ /२००९ रोजी कंदलगाव येथील गजेंद्र बनसोडे यांच्यासोबत झालेले होते. ठरल्याप्रमाणे फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात २ तोळे सोने व २५,०००/- रु व इतर संसारोपयोगी साहित्य दिले होते. फिर्यादी यांना आरोपीने पहिले १ वर्ष व्यवस्थित नांदविले व त्यादरम्यान त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन्ही नणंदेचे पती यांनी येऊन फिर्यादीच्या सासू सासऱ्यासमक्ष फिर्यादी कडे लग्नात राहिलेल्या हुंड्यातील रकमेचे २५,०००/- रुपये व १ तोळे सोने घेऊन ये म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी फिर्यादीने तिची माहेरची परिस्थिती हलाखीची आहे मला आई नाही वडील एकटेच आहेत व भाऊ गरीब आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत ज्यावेळी शेतात पिक येईल त्यावेळी मी पैसे आणून देते असे सांगितले. त्यावेळी त्या सर्वांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली.
त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी घरी झोपलेली असताना फिर्यादीच्या नणंदेचा पती हा घरात येऊन फिर्यादीचा विनयभंग केला. झालेला प्रकार फिर्यादीने सासू सासरे व पतीला सांगितला पण त्यांनी हे बाब कोणाला सांगू नको आणि पहिला हुंड्यातील उर्वरित रक्कम घेऊन ये म्हणून फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर दि. २७/०८/२०१३ रोजी फिर्यादीचे वडिलांचे मयतीला जाताना फिर्यादीचा चुलत सासरा व फिर्यादीच्या नणंदेचा पती यांनी फिर्यादी ला शरीरसुखाची मागणी केली. तसेच २०१४ मध्ये फिर्यादी ला दुसरा मुलगा झाल्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून तू राहिलेले पैसे घेऊन ये नाहीतर तुला बघतोच असे म्हणून धमकी दिली. तसेच फिर्यादीने शरीरसुखाची मागणीसाठी नकार दिल्यामुळे आरोपींनी फिर्यादीस उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून मारहाण करून जखमी करून फिर्यादीच्या दोन्ही मुलांना फिर्यादी कडून काढून घेतले. अश्या आशयाची फिर्याद मंद्रूप पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती. सदर कामी पोलीसांनी तपास करुन दोषारोपञ मा. न्यायालयात दाखल केले.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, वैदकीय अधिकारी व तपास अधिकारी हे होते.
फिर्यादी व वैद्यकीय अधिकारी यांची आरोपीचे वकिल ॲड. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी महत्वाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी मध्ये अनेक बाबींचा खुलासा झाला त्यापैकी काही म्हणजे सदर घटनास्थळ च्या आसपास अनेक वस्त्या असून त्यापैकी कोणत्याही साक्षीदार पुराव्याकामी कोर्टात तपासला गेला नाही तसेच फिर्यादी जबाबामध्ये घटनेच्या दिवशी फिर्यादीस संद्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जबर मारहाण केल्याचे नमूद केलेले होते परंतु वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार फिर्यादीस घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजताच तपासल्याचा महत्वाचा पुरावा बचाव पक्षातर्फे मा. कोर्टात मांडण्यात आला त्यामुळे मारहाणीच्या घटनेबद्दल साशंकता निर्माण होते असा युक्तिवाद कोर्टासमोर मांडण्यात आला.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील यांनी आरोपी नामे जगन्नाथ माने, नागप्पा बनसोडे, अनिता माने, तिपव्वा बनसोडे, कस्तूरा गाडेकर, महानंदा चौन्गल, गजेंद्र बनसोडे, नागप्पा चौन्दल सर्व रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड अभिजीत इटकर, ॲड राम शिंदे, अँड संतोष आवळे, ॲड फैयाज शेख, ॲड सुमित लवटे, ॲड शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.