परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यूप्रकरणी BSP आक्रमक, घटनेचा नोंदवला निषेध

सोलापूर : प्रतिनिधी
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती, ज्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडी मध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निदर्शन करत निषेध नोंदवला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावरून बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू वेदनादायी असून पोलिसांनी त्यांची हत्याच केली आहे. यातील संबधित पोलिसांवर १०२ कलम अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परभणी येथील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी जायला हवं होतं मात्र, फडणवीसांना मंत्री मंडळाचा विस्तार आणि शपथविधी महत्वाचा वाटला. राज्य सरकारने दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार याबाबत कठोर पावले उचलावित अन्यथा बहुजन समाज पार्टी आंदोलनाच्या शस्त्राने रस्त्यावर उतरेल असाही इशारा यावेळी देण्यात आलाय.