वैभव वाघे खून खटला, अँड.न्हावकर यांना विशेष सरकारी वकील नेमा आणि आरोपींना मोक्का लावा

सोलापूर : प्रतिनिधी
सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्या प्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, त्याचा मुले प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड, त्याचा पुतण्या संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
यात सरकारपक्षा तर्फे खटला चालविण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अँड संतोष न्हावकर यांची नियुक्ती करावी तसेच सर्व आरोपींनी संघटितपणे अनेक गुन्हे एकत्रितपणे केलेले असल्याने मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड याच्यावर 10 गुन्हे दाखल असल्याने व तो सर्वांचा प्रमुख असल्याने सर्व आरोपींना मकोका कायद्या खाली कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन खून प्रकरणातील फिर्यादी पीडित महिलेसह सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्तांना दिलेले आहे. पोलीस आयुक्त त्यावेळी उपलब्ध नसल्याने उपायुक्त काबाडे यांनी ते निवेदन स्वीकारले.
सिद्धार्थ सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन हे निवेदन दिल्याने त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन उपायुक्त कबाडे यांनी सर्व रहिवासी नागरिकांना दिले. न्यायालयात अजित व समरसेनजित या आरोपींच्या जामीन अर्जावर 3 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.