अखेर लढ्याला आले यश.. शुक्रवार पासून RTE प्रवेशासाठी अर्ज करता येणार.

सोलापूर : प्रतिनिधी
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ज्या वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरू होणार आहे. पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी १७ मे पासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत, त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
आरटीई प्रवेशाच्या निकषात बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किमी अंतरावरील महापालिका, जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित शाळा निवडाव्या लागत होत्या. त्यानुसार दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्जही संकेत स्थळावर प्राप्त झाले. पण, उच्च न्यायालयात दाखल याचिके वरून न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिली.
त्यानंतर मात्र शालेय शिक्षण विभागाला पूर्वीचा बदल मागे घ्यावा लागला. आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यिता शाळांची देखील निवड करता येणार आहे. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवीपर्यंत शासना कडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे. १५ जून पासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली लॉटरी काढण्याचे नियोजन आहे.