कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्कार जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी
नामदेवराव भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव बंडूजी भालशंकर यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत, शीलवंत, गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता शिवस्मारक सभागृह नवी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. पुरस्कार वितरणाचे हे ११ वे वर्ष आहे.
यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सोमपा मधील ४६९ बदली रोजंदारी पैकी १३१ कर्मचाऱ्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून सेवेत कायम नियुक्ती देणे व उर्वरित २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची अंतिम स्वरूपाची यादी करून सेवेत कायम करण्यासंदर्भात प्रशासनास सततचा पाठपुरावा करणे व सोमपा कर्मचाऱ्यांचा लाड पागे स्थगितीचा योग्य रीतीने मा.औरंगाबाद खंडपीठात महाराष्ट्र फेडरेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल व अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी निस्वार्थीपणे शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करत असल्या मुळे व गोरगरीब कर्मचाऱ्यांना निस्वार्थीपणे न्याय मिळवून देणारे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांची महात्मा जोतीबा फुले राज्यस्तरीय गुणवंत कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे गौरव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर यांनी कळविले आहे.
या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात येणार आहे. हा पुरस्कार अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांना जाहीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत असून अधिकारी व समाजातील नेते व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.
यावेळी गौरव समितीचे सचिव बोधिप्रकाश गायकवाड, प्राध्यापक युवराज भोसले, डॉ राजदत्त रासोलगीकर, रवी देवकर, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, नीलकंठ शिंगे, मिलिंद बालशंकर, दाऊद अत्तार, सुशीलचंद्र बालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे, सत्यवान पाचकुडवे, उपस्थित होते.