लाचखोर आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील विद्यानगर येथील घरी ACB पथक दाखल, काय झाले पुढे.?

सोलापूर : प्रतिनिधी
अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर ऊर्फ शेखर देशपांडे यांच्यावर आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. आता जावळेंच्या सोलापुरातील घरी ACB पथक दाखल झाले असून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.
जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल
लाच प्रकरणात फरार असलेले अहमदनगरचे आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले. सोलापुरातील विद्या नगर परिसरात पंकज जावळे यांचे घर असून मागील चार वर्षांपासून इथे कोणीही राहायला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पंकज जावळे हे अहमदनगर आयुक्त होण्यापूर्वी सोलापुरात जिल्हा प्रशासन अधिकारी उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी विज्ञानगर येथे पंकज जावळे यांचे घर होते. याच घरात एसीबी पथककडून चौकशी सुरु करण्यात आली. सोलापूर एसीबी विभागाचे 7 ते 8 अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले.
या घरात घरगुती साहित्याशिवाय काहीही आढळून आलेले नाही, घर मात्र जावळे यांच्या मालकीचे आहे. या संदर्भात आम्ही अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती एसीबीचे उपधीक्षक गणेश कुंभार यांनी दिली.