गोवंशसदृश मांसप्रकरणी पाचजणांवर गुन्हा, मुख्य आरोपी फरार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील नागनाथ नगरात अब्दुल रजाक सय्यद याच्या सांगण्यावरून चौघांनी गोवंशसदृश दोन प्राण्यांचे मांस विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सय्यद याच्यासह जहांगीर बाबुलाल नदाफ, इरफान इर्शाद हुस्सेन, मुजाहित मुर्तुज कुरेशी व निजाम अब्दुल गफुर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पाच जणांनी कापून ठेवलेले दोन गोवंशीयसदृश्य प्राण्यांचे १५० किलो मांस, मुंडकी व कातडे-शिंगे अवैधपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री साठी ठेवले होते. कत्तल केलेल्या जनावरांचे मांस जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिस हवालदार समाधान गंजे यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना जेरबंद केले असून अब्दुल सय्यद फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार जनावरांचे हाल
नई जिंदगी परिसरात दोन तांबड्या रंगाच्या देशी खिलारी गायी व दोन तांबड्या गिर जातीच्या गायीबांधून ठेवण्यात आल्या होत्या. त्या कोणाच्या मालकीच्या आहेत, कशासाठी आणल्या आहेत, असे प्रश्न एमआयडीसी पोलिसांनी उमर फारूक औजकर, रा. ७० फूट रोड मार्केटजवळ याला विचारले, पण, जनावरांच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक उत्तरे व कागदपत्रे दिली नाहीत. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. गोवंशीय जनावरे आणून त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता त्यांना त्रास होईल, अशा अवस्थेत अत्यंत क्रूरपणे, निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्या प्रकरणी उमर औजकर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.