नाना पटोलेच्या फोटोस दुग्धाभिषेक, काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे यांनी भाजपवर केली सडकून टिका

सोलापूर : प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्ताकडून आपले पाय धुवून घेतले याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. सोलापुरातील आंदोलनात नाना पटोले यांच्या फोटोस चिखल लावत निषेध नोंदवला होता.
भाजपाच्या या प्रवृत्तीचा, खोट्या अपप्रचाराला निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा चौक येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोस दुग्धाभिषेक करण्यात आला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे हे खासदार म्हणून निवडून आल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजप नाराज असून त्यांना भीती वाटत आहे. आगामी सोलापूर शहर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा काँग्रेस जिंकेल असे त्यांना वाटत असल्याने ते रडीचा डाव खेळत असल्याची टीका काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे, नामदेव फुलारी, अमर पाटील, काशिनाथ होनराव, परशुराम राऊतराव, समर्थ हिटनल्ली आदी उपस्थित होते.