मेव्हण्याच्या पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप, दुसऱ्या आरोपीस सक्तमजुरी

सोलापूर : प्रतिनिधी
पत्नीला नांदायला न पाठविल्याच्या रागातून महेंद्र सुभान भोसले (वय २३), महेर ऊर्फ मयूर रामा भोसले (वय २४) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शीतल अर्जुन काळे या गर्भवतीच्या खुनात दोषी धरले. त्यातील महेंद्र भोसले यास जन्मठेपेची तर महेर भोसले याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यातील बाळासाहेब सुभान भोसले हा आरोपी २० एप्रिल २०२० पासून फरार आहे.
गर्भवती शीतल काळे व फिर्यादी मयताचा पती अर्जुन काळे २० एप्रिल २०२० रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवण करून अरबळी (ता. मोहोळ) येथील शेतातील वस्तीवर झोपले होते. त्यावेळी बहिणीचा पती महेंद्र व त्याचा भाऊ मेहर आणि बाळासाहेब हे तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी माया कोठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी ती याठिकाणी नसून आईकडे बेगमपूरला असल्याचे अर्जुनने त्यांना सांगितले. त्यानंतर चिडलेल्या तिघांनी जंबिया चाकूने अर्जुनच्या हातावर व बगलेत वार केले. त्यावेळी भांडण सोडवायला अर्जुनची पत्नी शीतल आली. त्यावेळी आरोपींनी तिच्यावरही वार केले व पोटात चाकू भोसकला. शीतल जमिनीवर पडली व जागेवरच ठार झाली.
आरोपीने त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीवरही वार करून तिलाही जखमी केले. अर्जुन जिवाच्या आकांताने ओरडला व शेजारील लोक त्याठिकाणी आले. त्यावेळी आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी अर्जुन काळे यांनी कामती पोलिसांत २१ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची साक्ष गुन्ह्यात महत्त्वाची ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. राणे यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे अॅड. बायस व अॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.
शीतलचा मृत्यू अंधारात तोल जाऊन शेतीच्या धारदार अवजारावर पडल्याने झाला असून खरे आरोपी दुसरेच आहेत, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. पण, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी सर्व पुरावे न्यायालया समोर ठेवत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना शिक्षा ठोठावली. अॅड. राजपूत यांच्या कार्यकाळातील ही १०१ वी जन्मठेप ठरली.