मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आर्टी ला भरीव निधी द्या, अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्टी म्हणजेच डॉ अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती. अद्याप या संस्थेला मनुष्यबळ आणि आवश्यक निधी मिळालेला नाही. तरी उद्या होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्टीला मूर्त स्वरूप येण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. या मागणीचे निवेदन सकल मातंग समाज व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उप जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह शहर अध्यक्ष विजय अडसुळे, युवा नेते विश्वेश्वर गायकवाड, विकास जरिपटके, दिपक रजपूत, अनिल अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिक माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, ‘गेल्या दहा वर्षापासून मातंग समाज अनुसूचित जातीचे अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करा व बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करा, मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यासह साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्या, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या हया मागण्या करत आहे.
शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेने वेळोवेळी यासाठी आंदोलनेही केली आहेत. या मागण्यांची पूर्तता करून मातंग समाजातील असंतोष दूर करावा. यासाठी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले. यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.