मिरवणुकीत भगवे हिरवे निळे झेंडे झळकले, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचे नेतृत्व, हिरज नाका पिर हुसेन बाशा सवारीची उत्साहात सांगता

सोलापूर : प्रतिनिधी
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन व त्यांच्या ७२ जणांच्या कुटुंबीयांनी इस्लाम धर्माच्या रक्षणासाठी, सत्यासाठी व अन्याया विरूध्द करबला येथील युद्धात दिलेल्या बलिदानाच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी ५ दिवसांची मोहरम उत्सवाची सांगता करण्यात येते.
मुरारजी पेठेतील हाजी हजरत खान चाळ येथील पिर हुसैन बाशा सवारी पंजाची मंगलमय वातावरणात मिरवणूक काढून करण्यात आली. मोहरम निमित्ताने शहरात देखील गेले पाच दिवस पंजे, ताबूत व डोल्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या उत्सवातून हिंदू-मुस्लिमांचा ऐक्यभाव, सद्भावना तथा सामाजिक सलोख्याचे दर्शन दिसून आले.
हिरज नाक्याहून निघालेल्या सवारीच्या मिरवणुकीच्या अग्रभागी हिरवे, भगवे व निळे निशाण हाती घेतलेले तरुण होते. मिरवणूक मार्गावर शेकडो महिला भाविकांनी जलकुंभाद्वारे सवारीची पदप्रक्षालन केले. पारंपरिक मार्गावरून निघालेली ही मिरवणूक सावरकर मैदान येथील आसार शरीफ येथे पोहोचल्यानंतर तेथील पंजांची भेट घडविण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत ही मिरवणूक पूर्वस्थळी पोहोचली.
यावेळी सवारी उत्सावाचे आधारस्तंभ अमोल शिंदे हे उपस्थित होते. तसेच उत्सव प्रमुख अरबाज शेख, उत्सव अध्यक्ष लतिफ सय्यद, मानकरी फिरोज शेख, सोहेल मुजावर, कादर सय्यद, जलील शेख, रफिक शेख, रियाज अत्तार, व सर्व कार्यकर्ते, परिसरातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फौजदार चावडी पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले.