व्देष भावनेतून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या विरुद्ध शिक्षेची तरतूद गरजेची : ॲड.सुरेश गायकवाड

सोलापूर : प्रतिनिधी
अलीकडे सामाजिक व्यवस्था बिघडत चाललेली आहे. द्वेष भावनेतून, राजकीय सुडापोटी खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची स्पर्धा लागली आहे. या शिवाय नुकत्याच बदललेल्या नविन कायद्याच्या तरतूदीनुसार पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. यातून खोट्या गुन्हात आडकवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होतील, ज्यांची राजकीय सत्ता ते जुलूम करत राहतील. त्यामुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल यासाठी खोट्या गुन्ह्यात हेतुपूर्वक गुंतवणाऱ्या व निराधार आरोप करणाऱ्या व्यक्तीला देखील आता शास्तीची तरतूद असणे गरजेचे झाले आहे. तरच खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल अन्यथा या स्पर्धेतून मोठ्या प्रमाणात अराजकता माजायला सुरुवात होईल.
आपण पाहिले आहे की, नुकतेच पोलिस तपास यंत्रणेने नवनिर्वाचित खा रविंद्र वायकर यांना योगेश्वरी चिटफंड घोटाळ्यात अनावधानाने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कारण पुढे करून क्लीन चिट दिली आहे.
यापुर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अगदी अकंडतांडव करीत बेछूट आरोप करून वायकरांना या प्रकरणावरून हैराण केले होते व तपासयंत्रणेचा ससेमिरा मागे लावुन गुन्हा देखील नोंदविला होता. परंतु आता राजकीय सोय झाल्या नंतर वायकरांना त्या गुन्ह्यातून अलगदपणे वगळले आहे.
वास्तविक यातून सर्वसामान्य जनतेला अनेक प्रश्न पडत आहेत.शासनकर्ते तपास यंत्रणेनेचा नक्की गैरवापर करीत आहे. असे अनेक प्रकारावरून दिसून आले आहे ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने आता खोटे गुन्हे दाखल करून त्रास देणा-या विरूध्द कायद्यात स्वतंत्र शिक्षेची तरतूद करणे आवश्यक झाले आहे, असे मत सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.