सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सोलापुरात समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग, मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांचे विशेष प्रयत्न

सोलापूर : प्रतिनिधी

शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून, या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे. सोमवारी, दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंप चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली.

*नवीन पंपगृहाचे यशस्वी परीक्षण:*

उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. सोमवारी झालेल्या चाचणीदरम्यान सर्व पंप यशस्वीरीत्या कार्यान्वित झाल्याचे स्पष्ट झाले. या वेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, व्यंकटेश चौबे सार्वजनिक आरोग्य अभियंता जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

*समांतर जलवाहिनी प्रकल्पाची प्रगती:*

सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी समांतर जलवाहिनी प्रकल्पात एकूण ११० किलोमीटरपैकी १०७ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ तीन किलोमीटरचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन मनपा आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे. या प्रकल्पामुळे शहराला १७० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे.

*टेंभुर्णी बाह्यवळणाजवळ कामाची स्थिती:*

समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्याजवळील १८०० मीटर पैकी ८०० मीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ११० किलोमीटरपैकी १०७ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम तसेच ८४ किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे.

*प्रकल्पासाठी आयुक्तांचा विशेष पुढाकार:*

मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून आहेत. मक्तेदारास कार्यारंभ आदेश दिल्यापासून त्या दर शुक्रवारी समन्वय बैठक घेऊन कामाची प्रगती आणि अडथळ्यांचा आढावा घेत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच कामाला वेग प्राप्त होऊन, हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गांवर आहे.

*उर्वरित कामासाठी समन्वय:*

उर्वरित तीन किलोमीटर पाइपलाइनसाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, ग्रामीण पोलिस दल, आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी समन्वय साधून काम करत आहेत.

या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना अधिक नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!