अमेरिकेतून प्रशांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा, मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन तेथेही साजरा करणार

सोलापूर : प्रतिनिधी
१ सप्टेंबर १९९० साली आदरणीय शिवश्री पूरषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून मराठा सेवा संघाची स्थापना झाली. समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या प्रत्येक घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी बत्तीस कक्षांची स्थापना करण्यात आली. मातृसंस्कृतीचं महात्म्य आणि जिजाऊ माँ साहेबांचे स्वराज्य उभारणी मधिल प्रेरणादायी कर्तृत्व श्रद्धास्थानी ठेवून जय जिजाऊ जय शिवराय या उद्घोषात नवा विचार घेऊन सेवा संघ उदयास आला.
स्थापनेनंतर आरक्षणापासून ते इतिहासाच्या पुनर्लेखना पर्यंत, शिक्षणापासून ते ऊद्योग व्यवसायापर्यंत, अध्यात्मापासून अंधश्रद्धेपर्यंत, बळीसंस्कृती ते शिवधर्म स्थापनेपर्यंत , समाज कारणापासून राजकारारणापर्यंत अशा समाजाशी निगडीत सर्व विषयांवर प्रबोधना बरोबरच जागृतीचं खूप मोठं काम सेवा संघाने केले आहे.
शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यमसत्ता ही पंचसुत्री नजरेसमोर ठेवूनच सेवा संघाची बांधणी झाली. आज केवळ राज्यातच नव्हेतर देशभर आणि देशाच्या बाहेरही मराठा सेवा संघाच्या शाखा कार्यरत आहे. सहकारी बँका, पतसंस्था, बचत गट आदी आर्थिक संस्था बरोबर मुलींचे वसतीगृह, वाचनालय, सांस्कृतिक भवन आदीसह महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात सेवा संघाचं कार्यालय कार्यरत आहे.
१९ फेब्रुवारी शिवरायांची जन्मतारीख, जिजाऊंचे विधिमंडळात तैलचित्र, मराठा आरक्षण, जेम्स लेन पुस्तक बंदी, दादू कोंडदेव पुतळा हटविणे, या आणि अशा अनेक आघाड्यांवर सेवा संघाने अविरतपणे प्रबोधनाचे काम केले प्रसंगी आंदोलनंही उभी केली. वधुवर परिचय मेळावे, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन, उद्योग व्यवसाय कृषी विषयी मार्गदर्शन, शिक्षक पुरस्कार, महीला पुरस्कार याबरोबरच मराठा जोडो अभियान, जिजाऊ रथ यात्रा, विविध आधिवेशने, शिवधर्म परिषदा शिक्षक परिषदा आदी माध्यमातून समाज जागृत आणि प्रेरित करण्याचं काम मराठा सेवा संघाने केले आहे. जिजाऊ ज्ञान मंदिर ही शिक्षण क्षेत्रातील एक नवीन संकल्पना तयार केली आज अनेक ठिकाणी ही ज्ञान मंदिर जोमाने कार्यरत आहेत.
सिंदखेड राजा येथिल जिजाऊ सृष्टी, शिवधर्म पीठ व नागपूर येथिल बळीराजा संशोधन केंद्र ही खुप मोठी निर्मिती सेवा संघाने केली आहे. हजारो लेखक, वक्ते, प्रकाशक निर्माण करुन वाचन व लिखाण संस्कृती वाढविण्यामधे सेवा संघाचं योगदान खुप मोठं आहे.
बहुजनांचे हीत डोळ्यासमोर इतर बहुजनवादी चळवळी सोबत संवाद ठेऊन जातीय सलोखा, धार्मिक सलोखा राखण्यामध्ये सेवा संघ आणि सर्व कक्षानी उत्तम भूमिका बजावली आहे. तेहत्तीस वर्षांच्या सेवा संघाच्या यशस्वी वाटचालीत संपूर्ण समाजाचं भरभरुन सहकार्य मिळालं. आपणा सर्वांच्या सहभागातूनच ही चळवळ अत्यंत ताकदीने उभी आहे व यापुढेही वेगाने कार्यरत राहणार आहे तशी प्रेरणा आम्हाला मिळत राहो ही आई जिजाऊ चरणी प्रार्थना.
एका सामाजिक उपक्रमाप्रसंगी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी दत्तमामा मुळे, कल्याण गव्हाणे, प्रशांत पाटील, सूर्यकांत पाटील, रमेश जाधव, सदाशिव पवार, लक्ष्मण महाडिक, लताताई ढेरे, आदीसह युवक उपस्थित होते.
पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या हार्दिक सदिच्छा. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय असे म्हणत अमेरिकेतून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी हा लेख पाठवून मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.