सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

विधानसभेनंतर पद्मशाली समाजाचे दोन आमदार असतील, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अधिवेशनात ठरणार निर्णय

सोलापूर : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे व माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगरनजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात होणार आहे. दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अ.भा. पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, आयएएस अधिकारी पी. नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावथ्री, अ भा. पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोक्कुला देवेंद्र, महासचिव वनम विश्वनाथ, अ. भा. पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा वनम दुष्यंतला, अ.भा.पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अ.भा.पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक व वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अ. भा. पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम तसेच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या व मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री बी.अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उद्घाटन सत्रात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्यासह बोला शिवशंकर, जनार्दन कारमपुरी, अशोक इंदापुरे, गड्डम जगन्नाथ, वैभव सुर्या, दशरथ गोप, पी. नरहरी, सत्यनारायण बोल्ली, नरसय्या आडम, कंदागटला स्वामी, श्रीधर सुंकरवार आदींचे मार्गदर्शन होणार आहे.

दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. युवक व महिलासंबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. विविध विषयांवर चर्चासत्र ठेवून शेवटी महत्त्वाच्या ठरावांचे वाचन होणार आहे.

या अधिवेशनास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे तसेच पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संघ, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघ, पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे सरचिटणीस दयानंद मामड्याल,

पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, विश्वस्त मुरलीधर अरकाल, महांकाळ येलदी, संतोष सोमा, अंबादास बिंगी, अशोक इंदापुरे प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते.

मार्कंडेय महामंडळ स्थापन करण्याची मुख्य मागणी

या अधिवेशनात विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत.महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महर्षी मार्कंडेय यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करावे व याकरिता 500 कोटींची तरतूद करावी या मुख्य मागणीचा ठराव या अधिवेशनात करण्यात येणार आहे. विडी व यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने या उद्योगांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन उर्जितावस्था देणे, सध्या काम नसलेल्या रेडिमेड-गारमेंट कामगारांना रोजगार मिळवून देणे, सुशिक्षित-उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराअभावी सोलापूर सोडून परगावी जावे लागत आहेत, अशांसाठी सोलापुरात नवीन उद्योगधंद्यांची निर्मिती करून स्थलांतर रोखणे, पूर्व भागातील बंद पडलेल्या बँकांना पुनरुज्जीवित करणे

यासह विविध समस्यांवर मंथन करून उपाय शोधण्यात येणार आहे. सोलापूरच्या पूर्व भागाचे गतवैभव मिळवून देण्याचा निर्धारही या अधिवेशनात करण्यात येणार आहे, असेही महेश कोठे व नरसय्या आडम यांनी सांगितले.

आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये आडम मास्तर आणि महेश कोठे यांना अनुक्रमे शहर मध्य आणि शहर उत्तर ची जागा मिळाल्यास विधानसभेनंतर दोन पद्मशाली समाजाचे आमदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल असा विश्वास आडम मास्टर तर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!