जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा ईव्हीएमवर संशय, विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान यश मिळाले आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ५ जागांवर भाजप विजयी झाले आहे तर ५ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली आहे. एका जागेवर शेकाप विजयी झाली आहे. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर व ईव्हीएमच्या मतदान/ मतमोजणी प्रक्रियेवर संशय घेतला आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे, माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही मतमोजणी व मतदान प्रक्रियेवर संशय घेतला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी या प्रक्रियेवर संशय घेतल्याने सर्वसामान्यांच्या मनात मतदान व मतमोजणी प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. त्या त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या संशयाला लेखी उत्तर दिले आहे. तांत्रिक दृष्ट्या हे उत्तर दिले असले तरीही मतदारांच्या मनातील संभ्रम आजही कायम असल्याचे दिसत आहे.
या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पराभूत झालेल्या- उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या सर्वच्या सर्व तीन, शिवसेनेचे सर्वच्या सर्व तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व दोन उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन पैकी दोन उमेदवारांचा, भाजपच्या सहा पैकी एका उमेदवाराचा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा पैकी दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे. या शिवाय संजयमामा शिंदे, धर्मराज काडादी, रणजित शिंदे या नावाजलेल्या अपक्ष उमेदवारांचाही पराभव झाला आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया, ईव्हीएमबद्दल सामान्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.