मारकडवाडी ग्रामस्थ ‘बॅलेट’वर ठाम आज मतदान, जमावबंदी लागू गावाला छावणीचे स्वरूप

सोलापूर : प्रतिनिधी (माळशिरस)
‘ईव्हीएम’वर आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती. प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश लागू केला असून, गावातील २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
मतदान आज ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. मात्र ‘आमच्यावर लाठीचार्ज झाला, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहोत,’ अशी आक्रमक भूमिका मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, मारकडवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर गावकरीही मतदान घेण्यावर अडूम बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर मारकडवाडी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. आमच्या गावातून आमदार उत्तम जानकर यांना जादा मतदान झाले आहे असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.