जय मार्कंडेय च्या जयघोषात श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक जल्लोषात
पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट, आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
श्रावण शुध्द पौर्णिमेस भारतातील तमाम पद्मशाली समाज बांधव श्री. मार्कंडेय रथोत्सव साजरा करतात तो नुलू पुन्नामी म्हणून. नुलू म्हणजे सूत, धागा, सुत्र कापसाच्या सुताचा धागा, परंपरागत वस्त्रोद्योगाच्या व्यवसायाप्रती कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस. त्या व्यवसाया विषयी निष्ठा प्रकट करणे. या व्यवसायाचे आद्य जनक असलेले श्री भावनाऋषी यांचा राज्याभिषेक सोहळा, राज्य रोहण सोहळा या दिवशी संपन्न झाला तो आनंदोस्तव परंपरेने साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा व भारतात हा दिवस राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतात, तसे पद्मशाली बांधव नुलू पुन्नामी म्हणून साजरा करतात. दरम्यान सोलापुरातील मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्त श्रावण शुध्द पौर्णिमा वार-सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी श्री. श्रीनिवास पुंडलिक इंदापुरे (परिवार) यांच्या तर्फे पहाटे ४.३० वाजता श्रीस पुजा, त्यानंतर अंबादास संगा (फंड) यांच्या कडून पहाटे ५.०० वाजता पानपूजा, श्री महर्षि मार्कंडेय महामुनींचे अभिषेक पुजा लक्ष्मी नारायण एस. दुडम, सौ. सुवर्णा श्री. नक्का यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर चंडीयाग नवग्रह (होमहवन) पुजा कर्ता आनंद जिल्ला आणि सिध्दाराम कुपल यांच्या हस्ते तसेच
उत्सवमुर्ती महाअभिषेक पुजा सुदर्शन गुंडला यांच्याहस्ते करण्यात आले, नूलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमेला पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता.
दरम्यान बुधवारी नारळी पौर्णिमा निमित्ताने मार्कंडेय मंदिरात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती, पदमशाली पुरोहित संघमच्या सहकार्याने यज्ञोपवीत धारण आणि रक्षाबंधन विधी पार पडलं, यानिमित्ताने मंदिरातील मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती, दरम्यान सकाळी 11 वाजता पालखी आणि उत्सव मूर्ती मंदिराबाहेर आणण्यात आलं, उत्सव मूर्ती रथावर ठेवण्यात येऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते पूजा करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला, याप्रसंगी पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष फलमारी, सचिव संतोष सोमा, पदमशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव दशरथ गोप, अंबादास बिंगी, राजाराम गोसकी, जनार्दन कारमपुरी,-रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, चेतन नरोटे, राजमहिंद्र कमटम,रमेश कैरमकोंडा, महांकाली येलदी,सेवा निवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार,अशोक इंदापुरे,उमेश मामड्याल,यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम,नागेश बोमड्याल, प्रथमेश कोठे, विजय निली, नागेश बंडी, अविनाश शंकू, श्रीनिवास दासरी, संदीप श्रीचिप्पा, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान जय मार्कंडेयच्या जयघोषात ही मिरवणूक मार्गस्थ झाली, कन्ना चौक पदमवंशम संघटनेच्या वतीने आणि माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल यांच्या वतीने विजापूर वेस येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हम सब एक है च्या घोषणाबाजी करण्यात आली.
मिरवणुकीत अग्रभागी दोन अश्व चोपदार आणि भालेदार होते पालखीत शिवलिंग आणि बैलजोडीच्या रथावर उत्सव मूर्ती होती यावेळी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी गर्दी केली होती. मिरवणुकीत श्रीनिवास अनंतुल यांनी पारंपरिक हातमागावर दिवसभर वस्त्र विणून रात्री तयार झालेले वस्त्र श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी अर्पण करून आपली सेवा बजावली. या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझीम संघाच्या वतीने बहारदार लेझीमचा डाव सादर करण्यात आलं. तसेच विवेकानंद शक्तिप्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे शक्तीप्रयोग सादर करून लक्ष वेधले.
दरम्यान मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डिजेचा समावेश होता, डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता अनेक मंडळांनी आकर्षक देखावा सादर करून लक्ष वेधून घेतला. विविध डान्स ग्रुपने तेलुगू, हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली. मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात येत होता, हि मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक, रत्नमारुती चौक, जमखंडी पूल, पदमशाली चौक, दत्त नगर, मार्कंडेय रुग्णालय, जोडबसवण्णा चौक,राजेंद्र चौक,बुलाभाई चौक,कन्ना चौक,उद्योग बँक,साखर पेठ,गुरुवार पेठ, समाचार चौक,माणिक चौक म,विजापूर वेस मार्गे मार्कंडेय मंदिर येथे उशिरा समारोप करण्यात आला.
30 मंडळाचा सहभाग
घोंगडे वस्ती प्रतिष्ठान, बजरंग सेना, महाराष्ट्राचा राजा गणपती, जय माता दी प्रतिष्ठान, राडा बॉईज सामाजिक संस्था, श्री. विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळ, जय पद्मशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था, श्री. मार्कडेय जन्मोत्सव मंडळ संचलित SM प्रतिष्ठान, आदर्श प्रतिष्ठान, मार्कंडेश्वर युवा प्रतिष्ठान, जय मार्कडेय बहुउद्देशीय सामाजिक संस्था,जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, रुबाब बॉईज (श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ), जयभवानी प्रतिष्ठान, फ्रेंड्स डान्स ग्रुप, महात्मा गांधी विणकर मित्र मंडळ, श्री राम सेना प्रतिष्ठान, हिंदू बॉईज सामाजिक संस्था, निलकंठेश्वर मातृ भूमी मित्र मंडळ, ओम साई प्रतिष्ठान, श्री. मार्कडेयराज प्रतिष्ठान, आर्या २ डान्स ग्रुप, श्री दत्तात्रय लेझीम संघ संयुक्त हिंदुत्व साम्राज्य, सोलापूर, न्यु डी डान्स ग्रुप या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.