हनमे कुटुंबीयांच्या शिरपेचात साईराजने रोवला मानाचा तुरा, हा पट्ट्या नक्की मेडल आणणार असे म्हणत मनोज जरांगे यांनी दिल्या शुभेच्छा

सोलापूर : प्रतिनिधी
देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे. तो आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हा नक्की मेडल आणणार अशा शब्दात शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
मनोज जरांगे पाटील हे शनिवारी छत्रपती संभाजीराजे चौकात मालवण दौऱ्यावर जाताना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सकल मराठा समाजाचे नेते राजन जाधव, यांनी साईराज याची भेट जरांगे पाटील यांच्याशी घालून दिली.
सोलापुरातील हा आर्चरी या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांमध्ये जाणारा पहिलाच खेळाडू असल्याचे सांगितले. यावेळी जरांगे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच हा नक्की मेडल आणणार असा विश्वास सर्वांसमोर व्यक्त केला. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.
साईराज हणमे याच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुलाचे संस्थाचालक माजी महापौर मनोहर सपाटे, प्राचार्य, क्रीडाशिक्षक, आर्चरी असोसिएशनचे उपाध्यक्ष ,सचिव हरिदास रणदिवे यांनी भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.