“स्व. मेघराज (विकी) रोडगे स्मृती चषक” बुद्धिबळ स्पर्धा पाचव्या फेरीअखेर मुलात अर्जुन, सर्वज्ञ तर मुलीत विश्वजा, गिरीशा आघाडीवर

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व पोलीस कल्याण केंद्राच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमी आयोजीत “स्व. मेघराज (विकी) रोडगे स्मृती चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईचा अर्जुन सिंग व पुण्याचा सर्वज्ञ बालगुडे तसेच मुलीच्या गटात नागपूरची विश्वजा देशमुख व मुंबईची गिरीशा पै यांनी संयुक्तरीत्या आघाडी घेत सर्धेत चुरस निर्माण केली आहे. तर राघव पावडे (पुणे), मेधांश पुजारी (मुंबई), रेड्डी हेयान (पुणे), ईशान लड्डा (अमरावती) मुलांमध्ये तर ठाण्याची उथारा कार्तिक मुलींमध्ये साडेचार गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
सोलापुरातील पोलीस कल्याण केंद्रातील ड्रीम पॅलेस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये पहिल्या पटावर पुण्याचा गोरांश खंडेलवाल व मुंबईचा अग्रमानांकित अर्जुन सिंग यांच्यातील फ्रेंच डिफेन्स ऍडव्हान्स वेरीएशनने सुरू झालेल्या आकर्षक लढतीत अर्जुनने मध्यपर्वात वजीर, उंट व अश्वाच्या मदतीने गोरांशच्या राजावर प्रखर हल्ला चढवत आक्रमकरीत्या खेळत ४० व्या चालीला मात केली. तसेच मुलींच्या गटात पहिल्या पटावर नागपूरची विश्वजा देशमुख व अग्रमानांकीत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईची त्वीशा जैन यांच्यातील कारोकान बचाव पद्धतीने झालेल्या गावात दोघांनीही आक्रमक चाली करत डावावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु डाव संतुलीत स्थिती असताना त्वीशाने केलेल्या चुकीचा विश्वजाने अचूक फायदा घेत ६५ व्या चालीला विजय संपादन केला.
सदर स्पर्धा कै. मेघराज (विकी) रोडगे यांच्या स्मरणार्थ नामवंत उद्योजक अरुण रोडगे यांनी प्रायोजित केलेल्या आहेत. पाचव्या फेरीची सुरुवात विद्यापीठ सिनेट सदस्य सचिन गायकवाड, शारीरिक शिक्षण संघटनेचे सुहास छंचुरे, प्रा. संतोष खेंडे, प्रा. शिवशरण कोरे यांनी तर पाचव्या फेरीची सुरुवात सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, सचिव चंद्रकांत रेम्बर्सू, निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, ज्येष्ठ संघटक एम शफी यांनी करत खेळाडूंचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाऊसाहेब रोडगे, महेश धाराशिवकर, दिनेश जाधव, सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, तर त्यांना सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्टीय पंच रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, प्रशांत पिसे, भरत वडीशेरला, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, यश इंगळे, प्रज्वल कोरे काम पाहत आहेत.
पाचव्या फेरीअखेरचे महत्वाचे निकाल
(मुले) – सर्वज्ञ बालगुडे वि. वि. प्रध्योत मिश्रा (पुणे), राघव पावडे वि. वी. निव बाफना (मुंबई).
मुली: गिरीशा पै वि.वि.अन्वी हिंगे (पुणे) , उथारा कार्तिक वि.वि. आस्था सुरकर (वर्धा), स्वरा गांधी (नागपूर) वि. वि. मृण्मयी डावरे (मुंबई)